• 17 सप्टेंबर रोजी पालकमंत्र्यांच्याहस्ते अभियानाचा शुभारंभ
•युवा संगम न्यूज 16/9/2025
कारंजा (घा) :
ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी सुरू करण्यात आलेले मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान जिल्ह्यात यशस्वीपणे राबविण्यात येणार आहे. दि.17 सप्टेंबर ते 31 डिसेंबरपर्यंत राबविण्यात येत असलेल्या या अभियानाचा शुभारंभ पालकमंत्री डॅा.पंकज भोयर यांच्याहस्ते 17 सप्टेंबर रोजी सालोड येथे होणार आहे. अभियानात ग्रामपंचायती व गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या अभियानांतर्गत गावांना समृद्ध बनवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. अभियान विविध विभागांना एकत्र आणून गावांच्या समस्यांचे निराकरण करेल आणि गावातील लोकांना लोकसहभागातून विकासाच्या मुख्य प्रवाहात सामील करेल. अभियानाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व 521 ग्रामपंचायतीमध्ये विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आलेले आहे. पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते ग्रामपंचायत, सालोड हिरापुर येथे अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ होणार आहे. तसेच तालुकास्तरावर आमदारांच्याहस्ते त्यांच्या कार्यक्षेत्रात येत असलेल्या एका ग्रामपंचायतीमध्ये तालुकास्तरीय शुभारंभ होणार आहे.
या अभियानाचे प्रमुख घटक सुशासन युक्त पंचायत तयार करणे, स्वनिधी व सामाजिक दायित्व निधीतून ग्रामपंचायत आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, जल समृद्ध, स्वच्छ व हरित गांव, मनरेगा व इतर योजनांचे अभिसरण, गावातील संस्था सक्षमीकरण, उपजीविका विकास, सामाजिक न्याय, लोकसहभाग व श्रमदान यांच्या माध्यमातून लोकचळवळ निर्माण करणे हे आहेत. अभियानाच्या प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये विविध विभाग जसे कृषी, शिक्षण, आरोग्य, रस्ते, स्वच्छता, जलव्यवस्थापन आणि इतर अनेक विभागांचे कार्य या अभियानात समन्वित केले जाईल. योजनेत उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायतींना पुरस्कार दिले जाणार आहे.
योजनेंतर्गत ग्रामपंचायतीने 100 गुणांचे मूल्यांकन होईल. मुल्यांकनामध्ये गावातील स्वच्छतेपासून ते पाणी व्यवस्थापनापर्यंत, आरोग्य सुविधांपासून ते शिक्षणापर्यंत अनेक बाबींचा समावेश असेल. अभियानासाठी ग्रामपंचायतींना प्रोत्साहन आणि मार्गदर्शन करण्यासाठी प्रत्येक गावासाठी एक विशेष कार्य अधिकारी मदत करेल. अभियानांतर्गत गावांचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यात गावांमधील पाणीटंचाई, रस्ते, आरोग्य, शिक्षण, रोजगार निर्मिती अशा बाबींचा समावेश आहे. जिल्ह्यातील सर्व अधिकारी, ग्रामस्थांनी या अभियानाला यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण यांनी केले आहे.