आष्टी तालुका दुष्काळात 'नंदनवन' फुलणार

आष्टी तालुका दुष्काळात 'नंदनवन' फुलणार
युवा संगम न्यूज,4/11/2025
कारंजा(घा):-
आमदार सुमित वानखेडेंनी दिलेला शब्द पाळला.
आमदार सुमित वानखेडे यांच्या प्रयत्नांनी 'आष्टी उपसा सिंचन प्रकल्पा'ला रु. ७३ कोटींची मंजुरी; वर्षानुवर्षे दुष्काळी असलेल्या भागात 'नंदनवन' फुलणार

पाण्याची तीव्र टंचाई, शेतीसाठी सिंचनाचा कोणताही स्रोत नाही आणि त्यामुळे हलाखीचे जीवन जगणाऱ्या आष्टी तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांसाठी आज एक अत्यंत आनंदाची आणि दिलासादायक बातमी आहे. आर्वी विधानसभा मतदारसंघाचे कार्यक्षम आमदार सुमित वानखेडे यांच्या अथक प्रयत्नांना मोठे यश मिळाले असून, ७३ कोटी १९ लक्ष रुपये खर्चाच्या महत्त्वाकांक्षी 'आष्टी उपसा सिंचन प्रकल्पा'च्या (आष्टी लिफ्ट इरिगेशन) निविदा अखेर प्रसिद्ध झाली आहे. यामुळे परिसरातील भीषण पाणीटंचाई आणि सिंचनाच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघणार असून, शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणार आहे.
आष्टी तालुक्यातील आष्टी, थार, किन्ही, करोला, बोरखेडी, चामला, नागाझरी, वाडी, बांबर्डा, वाघोडा व बोटोणा या कोरडवाहू गावांना बारमाही सिंचन व्यवस्था उपलब्ध करून देण्याच्या शब्द विधानसभा निवडणुकीत आमदार सुमित वानखेडे यांनी दिला होता. या भागांमध्ये पिण्याच्या पाण्याची आणि शेतीच्या सिंचनाची गंभीर समस्या होती. विशेषतः दिवाळीनंतर जनावरांसाठी पिण्याचे पाणी शोधणेही कठीण होई, तर शेती पूर्णपणे पावसावर अवलंबून असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असे.  पाण्याअभावी येथील नागरिकांना स्थलांतरसुद्धा करावे लागत होते. या भागातील नागरिक सातत्याने पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी छोटे धरण किंवा मोठा तलाव बांधण्याची आग्रहाची मागणी करत होते. या भीषण वास्तवाची दखल घेत आमदार सुमित वानखेडे यांनी या भागातील शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी कंबर कसली होती आणि प्रस्तावित 'आष्टी उपसा सिंचन योजने' च्या प्रकल्पावर लक्ष केंद्रित केले.

आमदार वानखेडे यांनी या प्रकल्पाला गती देण्यासाठी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांची आणि परिसराच्या गरजेची दखल घेऊन, राज्याच्या नेतृत्वाने अवघ्या एका वर्षाच्या आत संपूर्ण प्रक्रियेला मान्यता देत या अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या निविदा मंजुरी दिल्या आहेत.

या योजनेमुळे लिफ्ट इरिगेशन स्कीमच्या माध्यमातून दुष्काळी भागातील शेतीत बारमाही पाणी उपलब्ध होऊन येथील शेतजमीन अक्षरशः नंदनवन बनणार आहे. आमदार सुमित वानखेडे यांनी केवळ घोषणा न करता प्रत्यक्ष कृतीतून हा अनेक वर्षांचा प्रलंबित प्रश्न सोडविल्याने, दिलेला शब्द पाळल्याने आष्टी तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. हा प्रकल्प केवळ सिंचनाचा स्त्रोत नसून, या भागाच्या आर्थिक आणि सामाजिक जीवनाला कलाटणी देणारा ठरणार आहे.

या यशाबद्दल आमदार सुमित वानखेडे यांनी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे आर्वी विधानसभेच्या वतीने मनापासून आभार मानले आहेत.
Yuva Sangam News

Malhar Advt

Yuva Sangam News