युवा संगम न्यूज 3/1/2026
कारंजा (घा) :-
सनशाईन स्कूल, कारंजा येथे नववर्षाच्या निमित्ताने संस्था सचिव विजय ठाकरे यांचे संकल्पनेतून तयार करण्यात आलेल्या कॅलेंडरचे लोकार्पण दिनांक 1 जानेवारी 2026 रोजी संपन्न झाले. या कॅलेंडरचे लोकार्पण संस्थाध्यक्ष प्रेम महिले यांच्या हस्ते पार पडले.
" सनशाईन स्कूलचा प्रत्येक विद्यार्थी हा भविष्यातील उज्ज्वल भारताचा शिल्पकार आहे, या विश्वासाने आम्ही सदैव विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहोत.
हे कॅलेंडर पाहताना प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात
“मीही असे यश मिळवू शकतो”
हा आत्मविश्वास निर्माण व्हावा, हाच आमचा खरा हेतू आहे.
तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, बौद्धिक व क्रीडा क्षेत्रातील यशाला योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देणे, त्यांच्या कर्तृत्वाला सन्मान देणे तसेच इतर विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणा, आत्मविश्वास व स्पर्धात्मक वृत्ती निर्माण करणे हा आहे. हे कॅलेंडर केवळ दिनदर्शिका नसून विद्यार्थ्यांच्या मेहनतीची ओळख आणि यशस्वी वाटचालीचे प्रेरणास्थान ठरत आहे.
यावेळी हेमंत बन्नगरे, पर्यवेक्षक पवन ठाकरे, जेष्ठ शिक्षिका संगीता चांगले, ममता दिवाणे,शालिनी गोरे, पुष्पा एकापुरे, संगीता ढोले तसेच समस्त शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या नववर्ष कॅलेंडरमध्ये इयत्ता १० वीचे गुणवंत विद्यार्थी, विविध व्यावसायिक क्षेत्रात यश संपादन केलेले माजी विद्यार्थी, शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी, डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा, सायन्स ऑलिमपियाडमध्ये प्राविण्य मिळवलेले विद्यार्थी तसेच विभाग स्तरावर क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थित मान्यवरांनी शाळेच्या उपक्रमाचे कौतुक करत विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.