जिल्ह्यात ११३ शाळांमध्ये १३४७ जागांवर प्रवेश देणार
युवा संगम न्यूज
कारंजा (घा):-
दि.17/2/2026
बालकांचा मोफत सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमानुसार 25 टक्के राखीव जागांच्या प्रवेश प्रक्रियेला मंगळवार दि.17 फेब्रुवारी पासून सुरुवात झाली आहे. शासनाच्या प्राथमिक शिक्षण संचालनालमाने शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी सुधारित सूचना निर्गमित केल्या असून, जिल्ह्यातील वंचित व दुर्बल घटकातील बालकांसाठी ही संधी उपलब्ध झाली आहे. पालकांना 10 मार्च पर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करता येतील.
पालकांनी संकेतस्थळावर जाऊन विहित मुदतीत अर्ज भरणे आवश्यक आहे. अर्जात घराचे ठिकाण निश्चित करण्यासाठी 'गुगल मॅप'चा वापर करण्यात येणार असून, रहिवासी क्षेत्रापासून एक किलोमीटर अंतरावरील शाळांची निवड करता येईल, पालकांना अर्जात अचूक माहिती भरण्याचे व शेवटच्या क्षणी होणारी तांत्रिक गर्दी टाळण्यासाठी वेळेत अर्ज करणे गरजेचे आहे. एकापेक्षा जास्त अर्ज भरल्यास लॉटरीसाठी विचार केला जाणार नसल्याने अर्ज काळजीपूर्वक भरणे आवश्यक आहे.
•कागदपत्रांची पूर्तता आवश्यक
प्रवेशासाठी पालकांचे आधारकार्ड, बालकाचा जन्मदाखला, रहिवासी पुरावा आणि एक लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेला दाखला अनिवार्य आहे. शिक्षण विस्तार अधिकारी यांच्या देखरेखीत कागदपत्र पडताळणी समिती गठीत करण्यात आली असून ही समिती पालकांनी अपलोड केलेल्या मूळ कागदपत्रांची तपासणी करणार आहे. पालकांनी केवळ एसएमएसवर अवलंबून न राहता पोर्टलवर नियमित अपडेट्स तपासावेत.
जिल्ह्यात १ हजार ३७६ जागा
जिल्ह्यात वर्धा तालुक्यात ४२ शाळांमध्ये ४६७ जागा व नर्सरी मध्ये २९, आर्वी तालुक्यात १२ शाळांमध्ये ११८ जागा, आष्टी तालुक्यात ४ शाळांमध्ये ५७ जागा, देवळी तालुक्यात १३ शाळांमध्ये १७१ जागा, हिंगणघाट तालुक्यात १८ शाळांमध्ये २१९ जागा, कारंजा तालुक्यात ६ शाळांमध्ये ८२ जागा, समुद्रपूर तालुक्यात ६ शाळांमध्ये ८२ जागा, सेलू तालुक्यात १२ शाळांमध्ये १६१ जागा याप्रमाणे 1 हजार 376 जागांसाठी प्रवेश प्रक्रिया होईल. चुकीची माहिती भरून दिशाभूल केल्याचे आढळल्यास प्रवेश कोणत्याही टप्प्यावर रद्द होणार असल्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी कळविले आहे.